पुस्तक परिचय 
पुस्तक     'क्षितिजापलीकडे' ( आत्मचरित्र)
लेखक :  प्रा. ए. डी.  जोशी सर  (  सोलापुरातील प्रसिद्ध आय. एम. एस .  शिक्षण संस्थेचे संस्थापक , जेष्ठ शिक्षण तज्ञ , कवी , काव्यप्रेमी शिक्षक मंच सल्लागार )

पुस्तकाची सुरुवात सरांच्या  पत्नीच्या दुर्धर आजाराच्या माहितीने होते आणि नंतर त्यांचा  जीवनपट फ्लॅशबॅक स्वरूपात वाचकाच्या  समोर येतो. खडतर असलेले सरांचे   बालपण, शिक्षणाविषयी असलेली सरांची   गोडी, पडेल ते काम करून  घेतलेले शिक्षण सर्वकाही विलक्षण व प्रेरणादायी. सरांनी  परिस्थितीपुढे न झुकता त्यावर मात करून यश संपादन केलं हि चिकाटी, जिद्द आजच्या  पिढीला मार्गदर्शक. भिक्षुकाचा मुलगा तो  एक नावाजलेल्या शिक्षण संस्थेचा संस्थापक हा सरांचा   प्रवास, त्यातील आलेले  अडथळे व त्यावर  काढलेले तोडगे सर्वच उल्लेखनीय. सरांच्या जीवनपटात  शिक्षण क्षेत्राविषयी असलेली  तळमळ ठायी ठायी दिसून येते.
वडिलांची असलेली कडक शिस्त, त्यांची सरांच्या   शिक्षणाविषयी असलेली तळमळ, यश संपादन केल्यानंतर सरांविषयी त्यांना वाटणारा अभिमान, त्यांची  साजरी केलेली एकसंष्टी यातील काही प्रसंग  मनाला भावनाशील  करून जातात . 
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. सरांच्या  यशात त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा आहे व त्याचा सरांनी  आवर्जून उल्लेख केला आहे तो देखील श्रीकृष्णाच्या सारथी स्वरूपात. कॅन्सर सारख्या आजाराला धीराने   सरांच्या  पत्नीने दिलेले तोंड याला कोणतीही  तोड नाही.   सरांच्या   काळातील व आजच्या काळातील शिक्षक, विदयार्थी, पालक यातील नातेसंबंध सरांनी मोठ्या खुबीने मांडले  आहेत.
शाळेतील विद्यार्थांच्या अपघाताचा प्रसंग व सरांवर   आलेले आरोपाचे बालंट व त्यातून परत बाहेर पडण्याचे सरांचे  धैर्य आजच्या  पिढीला  जीवनात येणाऱ्या संकटात  उभारी देणारे. विविध सामाजिक उपक्रमात सरांचा  असलेला सहभाग यावरून समाजाविषयी त्यांचे  योगदान दिसून येते.
  सर्व सुखे हात जोडून उभी असतांना पत्नी वियोगाचे दुःख सरांना  सहन करावे लागले.'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' असेच या घटनेला अनुसरून  म्हणावे लागेल.
सरांनी   जी जी  स्वप्ने पाहिलीत ती ती त्यांनी  आपल्या ज्ञान, हिंमत, चिकाटीच्या बळावर पूर्ण करून दाखविली.  अनेक विद्यार्थी सरांनी  घडविले. शिक्षण क्षेत्रात सोलापूरला एका उंचीवर नेऊन ठेवले.  सरांची  पुढील पिढी देखील सरांचा  हा वसा यशस्वीपणे चालवीत आहे . ' ज्या कॉलेज च्या वाटेने आज मी अनवाणी व साध्या कपडयात जात आहे त्याच वाटेवरून एके दिवशी चार चाकी घेऊन सुटाबुटात जाईन' हे सरांचे  बोल सरांनी खरे करून दाखविले. 
सरांना   आज  एकटेपणाची जाणीव हॊत आहे. पण  दीपस्तंभ देखील एकटाच असतो पण तो अनेक जणांना जीवनाची वाट दाखवीत असतो. भावी पिढीसाठी, विद्यार्थी लोकांसाठी  सर  एक दीपस्तंभच आहेत , मार्गदर्शक आहेत . स्वकर्तुत्वाने माणूस जीवनात किती मोठी उंची गाठू शकतो याचे आदर्श उदाहरण  आहेत . 
सामान्य ते असामान्यतेचा सरांचा  प्रवास निराशेचे मळभ दूर करणारा असाच आहे. 
सरांचे  हे आत्मचरित्र वाचकाला  खूप काही शिकवून जाते . सरांनी  सांगितलेले यशाचे फोर डी प्रत्येकाने मनावर बिबविणे गरजेचे आहे .


(महेश भा.  रायखेलकर)





Comments

Popular posts from this blog