कॉपी बहाद्दरांनो ऐका जरा

दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु आहेत व पुढील काही दिवसात इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा चालू होतील. परीक्षेतील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यात होणारे कॉपीचे प्रकार. ती होऊ नये म्हणून मोठी यंत्रणा राबवली जाते. अनेक प्रयत्न केले जातात. कॉपी मुक्त परीक्षा अभियान देखील काही ठिकाणी राबविले जाते. जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी  सारखे वरिष्ठ अधिका-यांना यात लक्ष घालावे लागते. मोठे मनुष्यबळ त्यासाठी द्यावे लागते.पोलीस यंत्रणा यासाठी काम करते. प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार हानिकारक आहे.  एवढे सर्व करूनही समस्येचे पूर्णतः निवारण होत नाही असे खेदाने नमूद करावे लागेल. या समस्येमधील मूळ घटक परीक्षार्थीं/ विद्यार्थी आहे.  तो जो पर्यंत मी कॉपी करणार नाही असे ठामपणे ठरवत नाही तो पर्यंत कॉपीचे प्रकार थांबणार नाहीत.
विद्यार्थ्यांनी  हे लक्षात घेतले पाहिजे कि आपण परीक्षा कश्यासाठी देतो?. परीक्षा हि त्या विषयाचे त्या विद्यार्थ्याला  किती आकलन झाले आहे याची एक कसोटी असते. त्या कसोटीसाठी देखील आपण कॉपी सारखा शॉर्टकट वापरत असूत तर त्या कसोटीस आपण खरे कसे उतरणार? एखाद्यावेळेस आपण  कॉपी सारख्या गैर मार्गाचा वापर करून पास देखील होऊ पण त्या विषयाचे आपल्याला ज्ञान असेल असे नाही. आज असे काही ठिकाणी चित्र दिसते कि हातात पदवी  तर आहे पण त्या पदवीला पात्र असे ज्ञान त्या पदवी धारकाकडे नाही. असे का बरे घडते? याचे उत्तर काही प्रमाणात या कॉपी प्रकारात आहे. परीक्षाच्या कसोटी मध्ये एखाद्यावेळेस विद्यार्थी कॉपी करून पास होईल पण भावी आयुष्यातील परीक्षे मध्ये कॉपी हा प्रकार चालत नाही. तेथे तुमच्या ज्ञानाची परीक्षा पाहिली जाते.  तेव्हा विद्यार्थीदशे मध्ये किंवा तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल त्यासाठी प्रामाणिक अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थी दशेत मिळवलेले ज्ञान भावी आयुष्यात वापरायचे आहे ते जर कॉपी सारख्या गैर मार्गाने मिळविले असेल तर असे ज्ञान कुचकामी ठरेल. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी, पालकांनी सांगणे त्यांचे समुपदेशन करणे खूप  गरजेचे आहे. एखादया  विषयाची भीती, शिक्षणा संबधी अनास्था, गैर प्रकाराला मिळत असेलेले पाठबळ अशी काही कारणे कॉपी या प्रकारामागे आहेत. खरं तर कॉपी करणारे विद्यार्थी ती करण्यासाठी एवढे डोके चालवतात ते डोके त्यांनी अभ्यासासाठी  वापरले तर कॉपी या मार्गाला त्यांना जायची गरज भासणार नाही.
आपला पाल्य परीक्षा तर देतोय पण त्यात तो काही गैर मार्गाचा वापर करत नाही ना हे   सतर्कतेने पहाणे हि पालकांची जाबाबदारी आहे. अभ्यासू वृत्ती, प्रामाणिकपणा हा यॊग्य वयातच रुजवावा लागेल. कॉपी सारखा मार्ग वापरणारा भविष्यात त्याच्या आयुष्यात गैर मार्गाला जाणार नाही असे ठाम पणे सांगता येणार नाही. प्रामाणिकपणे  मिळवलेले परीक्षेतील यश हेच खरे यश आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावर चांगल्याप्रकारे बिंबवावे  लागेल. आजची परीक्षा हि भावी आयुष्य सुदृढ बनवायचे टॉनिक आहे हे त्याला नीटसे शिक्षणव्यवस्थेने व कुटूंबव्यवस्थेने समजावून दयावे लागेल. प्रामाणिक, अभ्यासू वृत्तीचा विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक आहे, तेव्हा हा पाया पक्का करणे, मजबूत करणे हि आपल्या सर्वांची जबादारी आहे.   कॉपी हा कुसंस्कार आहे हे लक्षात घ्यावे लागेल व असा कुसंस्कारीत विद्यार्थी कधीही देशाचा उत्तम  नागरीक बनू शकत नाही.

महेश भा. रायखेलकर


Comments

Popular posts from this blog