रोजच्यासारखं मी आय.एम. एस. मध्ये सहावीत शिकत असलेल्या माझ्या मुलाला शाळेतुन त्याची शाळा सुटल्यानंतर आणण्यासाठी गेलो. नेहमीप्रमाणे तो शाळेच्या समोरच्या कॉरीडॉर मध्ये कोठेच दिसला नाही. मी तेथेच उभ्या असलेल्या त्याच्या टीचर कडे चौकशी केली असता 'त्याचे एका मुलाशी भांडण झाले आहे व त्या दोघांनाही प्रिन्सिपल मॅडम कडे नेले आहे' असे मला त्यांनी सांगीतले. मी प्रिन्सिपल मॅडम च्या केबिन कडे गेलो . केबिनच्या दारातच माझा मुलगा पार्थ त्याच्या टीचर व दुसरा एक मुलगा असे तिघे दिसले. मी त्याच्या टीचर कडे अधीक चौकशी केली असता माझ्या मुलाने त्या दुस-या मुलाला ज्याचे नाव मीत आहे हे नंतर मला मुलाकडून कळाले तोंडात चापट मारल्याचे कळाले. त्यामुळे मीत रडतच त्या टीचर कडे पार्थ ची तक्रार घेऊन गेला. आता त्या दोघांनाही टीचर प्रिन्सिपल मॅडम कडे घेऊन जाण्यासाठी त्याच्या केबीन समोर उभ्या होत्या. इतक्यात मीत चे वडील जे की त्याला शाळेतून शाळा सुटल्यानंतर घेऊन जाण्यासाठीच आले होते त्याला हुडकत प्रिन्सिपल मॅडम च्या केबिन पाशी आले. त्यांची व माझी पूर्वीची ओळख निघाली. त्यांनी झालेला प्रकार ऐकून घेतला. 'लहान मुलं आहेत . कधी तरी भांडणारच ! त्यात काय एवढं ! ' असा त्यांनी समजूतदारपणा दाखविला. मी देखील माझ्या मुलाला मीत ला ' सॉरी ' म्हणण्यास सांगितले. हे सर्व त्याच्या टीचर पहात होत्या. दोघांच्या पालकांची चांगली ओळख आहे हे पाहून त्यांनी हे प्रकरण प्रिन्सिपल मॅडम कडे न नेण्याचे ठरवले.
घरी जातांना मी मुलाला 'तू त्या मीत ला का मारलेस ?' असे विचारले असता तो रोज त्यास काही तरी चिडवत होता असे त्याने सांगितले. 'अरे तसे काही असेल तर टीचर ला सांगायचे ! परत कोणाला असे मारायचे नाही ! असे मी त्यास बजावले'. नंतर हे प्रकरण मी विसरूनही गेलो.
काही दिवसानंतर फ्रेडशिप डे च्या दिवशी मी नेहमीप्रमाणे मुलाला आणण्यासाठी गेलो. गप्पा मारत घरी जातांना मुलाने मीत ने त्याला फ्रेडशिप बँड बांधल्याचे सांगीतले. मी मुलास विचारले "तो हाच मीत का ज्याच्याशी तुझे भांडण झाले होते व तू त्यास मारले होते?. मुलगा हसत म्हणाला "हो तोच मीत". मला तो प्रसंग आठवला. मला माझ्या मुलाच्या विशेषतः मीतच्या निरागस पणाचे कौतूक वाटले. झाले गेले विसरून जावून त्यांनी फ्रेडशिप डे च्या दिवशी बँड च्या रूपात मैत्रीचा धागा गुंफला होता. आतातर मीत व माझा मुलगा चांगले मित्र झालेले आहेत. त्यांच्यातील गमतीजमती मला मुलाकडून कळत असतात.
मी विचार केला असे मोठांच्या बाबतीत घडले असते का ? नक्कीच नाही. कारण जसा माणूस मोठा होत जातो तशी त्याच्यातील निरागसता कमी कमी होत जाते. तो कोणतीही गोष्ट विसरायला तयार होत नाही. त्याच्यातील अहंकार मनातील अढी अजून घट्ट करतो. याच अंहकारपोटी कोणीही माघार घेण्यास तयार होत नाही .माघार घेणे म्हणजे कमीपणा असा एक गैरसमज, जो की नाती तोडतो. लहान मुलं सकाळी झालेली भांडणे दुपार पर्यंत विसरूनही जातात कारण त्यांच्या निरागस मनावर खोट्या मोठेपणाची , मीपणाची , अहंकारातेची धूळ साठलेली नसते . पण तेच मोठ्या माणसातील भांडणे वर्षानुवर्ष टिकून राहतात व ती टिकविण्यातच त्यांना मोठेपणा वाटतो .
माणूस म्हटलं कि चुका ह्या होणारच. नात्यामध्ये झालेल्या चुका विसरून पुढे जाणे कधीही हिताचे ठरते. एकाने चुक केली तर निरागसपणे दुसस-याने ती माफ करणे यात कसलाही कमीपणा नसतो. प्रत्येक माणसात काही ना काही अवगुण असतोच. अशा अवगुणांवर पांघरून घालून त्याच्यातील गुणाची कदर केली तर माणुस खुलतो. नाती जोडण्यास व ती टिकविण्यास हा धागा अत्यंत महत्वाचा ठरतो. लहानपणीची निरागसता आताही आपल्यात आहे फक्त त्यावर मोठेपणाचे, मीपणाचे, अहंकाराचे पडदे पडलेले आहेत. नाती टिकविण्यासाठी नवीन नाती जोडण्यासाठी असे पडदे निग्रहाने दूर करावे लागतील व त्यासाठी मनाची निरागसता मोठेपणी देखील जोपासावी लागेल.नाती हा जगण्यातील श्वास आहेत . तो श्वासच गुदमरायला लागला तर जगणं देखील कोंदट होईल. जगणं लहान मुलांप्रमाणे सुंदर बनवायचे असेल तर नाती टिकविणे व ती फुलविणे आवश्यक आहे. नात्यातील सूर निरागस होण्यासाठी मन निरागस असणे गरजेचे आहे. म्हणूनच सूर निरागस हो याच धर्तीवर मन निरागस हो असेही म्हणावे लागेल. सर्वांना गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
(महेश भा. रायखेलकर)

Comments
Post a Comment