आमचे पप्पा
आमचे पप्पा कै.श्री. भालचंद्र धोंडोपंत रायखेलकर एक शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत व्यक्तीमत्व. पप्पांची व्यक्तीरेखा, त्यांचा जीवनपट आज त्यांच्या प्रथम मासिक दिवशी मांडतांना ऊर भरून येतोय. भावना दाटून आल्यात .आठवणींनी मन व्यापलय . त्यांच्या जाण्याने एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
पप्पा त्यांच्या आई-वडिलाचे एकुलते एक अपत्य. १५ ऑगस्ट १९३८ हा त्यांचा जन्मदिवस. तुळजापूर तालुक्यातील रायखेल हे त्यांचे मूळ गाव शिक्षण त्या काळातली मॅट्रिक पर्यंत. लहानपणीचा त्यांच्यातील व्रात्यपणा पाहून काही काळ त्यांच्या काकांनी (गुंजोटी ता. उमरगा येथील श्रीकृष्ण संस्थेचे संस्थापक कै. श्री. हरीपंत रायखेलकर) त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतले . काकांचा कडक शिस्तीचा व संस्कारांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता.
मॅट्रिक नंतर १९५९ साली वयाच्या २१ व्या वर्षी ते पोलीस खात्यात कॉन्स्टेबल या पदावर भरती झाले पुढे १९७२ साली ते पी.एस. आय. झाले . उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, लातूर व शेवटी सोलापूर या जिल्ह्यात त्यांनी आपली सेवा बजावली. ३७ वर्षे एवढी दीर्घ काळ पोलीस खात्यात सेवा बजावून १९९६ साली सोलापूर येथे सहायक पोलीस निरीक्षक या पदावरून सन्मानाने ते निवृत्त झाले. सोलापूर येथे मरीआई पोलीस चौकी, गुन्हे शाखा येथे त्यांनी आपली सेवा बजावली. नोकरीच्या काळात अनेक गुन्ह्यांचा तपास त्यांनी केला . लातूर मधील किल्लारीच्या भूकंपाच्या वेळेस दोन-तीन महिने तिथे राहून त्यांनी आपली सेवा बजावली. निवृत्तीचा कार्यक्रम संपल्यानंतर जीप मधून घरी सोडतांना शेवटी जीप ड्रायव्हर ने त्यांना ठोकलेला कडक सॅल्यूट आजही मला चांगला आठवतोय.
पप्पांचे पितृछत्र लवकरच हरपले होते . वडिलांच्या माघारी त्यांनी त्यांच्या आईचा व्यवस्थित सांभाळ केला. आजीचेही माया,प्रेम आम्हांला खूप वर्ष लाभले.नॊकरीच्या काळात सततच्या बंदोबस्त, ड्युटीमुळे त्यांचा सहवास आम्हाला फारसा लाभला नाही. सणावाराला देखील ते कधी घरी असल्याचे आम्हाला आठवत नाही. पोलीस खात्यातील नोकरीमुळे संसारात बारकाईने लक्ष देणे त्यांना शक्य नसे . ती जबाबदारी आईने समर्थपणे पार पाडली. त्यांनी आम्हा भावंडाला कधी मारलंय, आमच्यावर कधी ओरडलेत, चिडलेत, अवाजवी शिस्तीचा बडगा उचललाय असे कधी झाले नाही. नोकरीचा ताण घरी कधी त्यांनी आणला नाही. नॊकरीच्या काळात त्यांचा सहवास फारसा लाभला नसला तरी वर्दीतील त्यांचे रुबाबदार व्यक्तीमत्व, त्यांना मिळणारा मान, त्यांचे रिवॉहल्वर , त्यांची परेडची तलवार, राहण्यासाठी मिळणारे शासकीय निवासस्थान यांचे नेहमीच आम्हाला अप्रूप वाटत असे .
पप्पांनी पोलीस खात्याची नोकरी अगदी सचोटीने केली. पैसाचा कधी हव्यास केला नाही. व्यसनापासून चार हात दूर राहिले. हाताखालील लोकांना उगीच त्रास दिला नाही. पदाचा वापर करून कधी अरेरावी केली नाही. साधेपणाची कास जन्मभर त्यांनी कधी सोडली नाही. पदाचा गर्व कधी केला नाही. पोलीस खात्यात एवढा साधा, सुसंस्कृत माणूस सापडणे विरळच . त्यांच्या या स्वभावाचे दाखले आजही त्यांच्या हाताखाली व सोबत काम केलेले देतात.
पोलीसाबद्धल, या खात्याबध्दल वाईट बोललेले, टिका केलेले त्यांना कधीही आवडत नसे. मोठा भाऊ जो कि पी.एस. आय. या पदावर सध्या कार्यरत आहे, त्याचा त्यांना नेहमीच अभिमान वाटे . तो घरी आला कि आताही ते त्याच्याशी पोलीस खात्याविषयीच्या गप्पा मारत असत.या खात्याविषयीचे अनेक किस्से त्यांच्या संग्रही होते. ते सांगतांना त्यात ते अगदी रमून जात. दूध हे त्यांचे आवडते पेय तर भजी, ओल्या शेंगा, ढाळा,मक्याचे कणीस, पिठलं हे त्यांचे आवडीचे खाद्य पदार्थ.
पप्पांना व्यवहार कधी जमला नाही. साधने ,संपत्ती साठवण्याचा मोह कधी त्यांना झाला नाही. उलटपक्षी शेजार-पाजा-यांनी कधी गरजे पोटी पैसे मागितले आणि त्यांनी ते दिले नाहीत असे कधी झाले नाही. ते परत येतील का नाही याचाही कधी त्यांनी विचार केला नाही. त्यांच्या या साध्या स्वभावाचा काही लोकांनी गैरफायदा घेतला पण याची खंतही त्यांनी कधी व्यक्त केली नाही. या बाबतीत कधी आम्ही त्यांना रागावलो तर ' त्याचा शेर होता त्याने तो नेला' असे ते म्हणत. साधेपणा, कनवाळूपणा , परोपकारी वृत्ती हीच त्यांची खरी संपत्ती होती जी की त्यांनी शेवटपर्यंत जपली. याच पुंजीच्या बळावर आयुष्यात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही. समाधानी, आनंदी जीवन कसे जगावे याची शिकवण ते आम्हाला त्यांच्या जगण्यातून शिकवून गेले.
आईचे पप्पांवर विलक्षण प्रेम होते. ती त्यांना सोडून कधी राहिल्याचे आम्हाला आठवत नाही. पप्पांना पाया पडतांना तिच्या चेह-यावरील भाव आजही मला चांगले आठवतात. ते तिच्यासाठी जणू तिचे देवच होते. पप्पांही तिच्यावर कधी ओरडलेत, रागावलेत किंवा त्यांच्यात कधी भांडणे झालेली आम्ही पाहिली नाहीत . निवृत्तीनंतर पप्पांना झालेल्या अपघात व त्यामुळे पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे ते जवळपास दिड वर्ष अंथरुणावर होते . या काळात आईने तसेच वहिनींनी त्यांची खूप सेवा केली. आईच्या सेवेमुळे व पप्पांच्या मनाच्या कणखरतेच्या व दणकट शरीरयष्टिच्या बळावर या दुखापतीतून ते पुन्हा उभे राहिले . हि लक्ष्मी- नारायणाची जोडी अखेर २०१३ साली आईच्या जाण्याने तुटली. आई गेल्यानंतर पप्पां काही काळ खचले पण नंतर स्वतःला सावरून घेत आमच्यात ते चांगलेच रमले.
निवृत्तीचा काळात सकाळी फिरायाला जाणे व त्यानंतर पूजा-पाठ व दिवसभर वाचन असा त्यांचा दिनक्रम होता. आई-वडिला विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पप्पांचा 'अमृत-महोत्सव' आम्ही मोठया उत्साहात साजरा केला . या प्रसंगी आई व पप्पांच्या चेह-यावरील आनंद व समाधान आजही आमच्या चांगल्या स्मरणात आहे. सोलापूरच्या सिद्वेश्ववर वर त्यांची श्रद्धा होती. या मंदिरातील अन्नछत्राला ते नेहमी देणगी देत. चौफेर वाचण्याने व जीवनातील चांगल्या-वाईट अनुभवाने त्यांच्या विचाराला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. त्यांच्या बोलण्यातुन ती जाणवत असे. त्यांच्या संग्रही विविध विषयांची अनेक पुस्तके होती. निवृत्तीनंतर काही काळ त्यांनी घरी वाचनालय देखील चालवले.
त्यांच्या चार नातवंडामध्ये माझा मुलगा चि. पार्थ हा सर्वात लहान. त्याचा सहवास त्यांना जास्त लाभल्याने त्यांचा तो अतीशय लाडका होता. त्याचा व्रतबंधनाचा सोहळा त्यांनी पाहिला. त्याला आम्ही रागावले व कधी मारले तर ते त्यांना आवडत नसे. ' हा माझा आनंदाचा ठेवा आहे' असे ते नेहमी म्हणत. पार्थलाही त्यांचा विशेष लळा होता. त्या दोघांचे एक वेगळेच विश्व होंते. त्यात त्यांच्या गमती-जमती चालत.शेवटच्या प्रसंगीही तो त्यांच्या अगदी जवळ होता. आपल्या आबांचे जाणे हे त्याच्या कोवळ्या मनात खळबळ माजवणारे ठरले. मोठया भावाच्या रूपात दुसरी पिढी पोलीस खात्यात सध्या कार्यरत आहे. बाकी पप्पांच्या तिन्ही नातवंडांनी आपपली कार्यक्षेत्र निवडली आहेत. माझा मुलगा सहावीत असल्याने त्याला कार्यक्षेत्र निवडण्यास आणखी अवधी आहे. आय.पी.एस. अधिकारी होऊन पोलीस खात्यातच त्याने भविष्यात सेवा बजवावी असे माझे स्वप्न आहे , ज्यामुळे रायखेलकर कटुंबाची तिसरी पिढी या खात्याची सेवा करू शकेल. अर्थात त्याची इच्छा असेल तरच हे स्वप्न पूर्ण होईल .
तीन भावंडात मी सर्वात लहान. मोठ्या बहिणीचे लग्न तसे लवकरच झाले . पप्पांचा सुस्वभाव तिच्यात तंतोतंत उतरला आहे. मोठा भाऊ देखील लवकरच नोकरीच्या निमित्ताने घरा बाहेर पडला. या दोघांपेक्षा आई-पप्पांचा सहवास मला जास्त लाभला. लहान असल्याने त्या दोघांच्या मानाने माझे लाडही जरा जास्तच झाले. आईच्या माघारी पप्पांची देखभाल व सेवा माझ्या पत्नीने खूप चांगल्या प्रकारे केली. पप्पांनी देखील तिला तिच्या आई-वडिलाच्या माघारी पित्याचे प्रेम दिले.माझ्या पत्नीच्या शिक्षकी पेशाचे त्यांना विशेष कौतुक होते . निवृत्तीनंतर पप्पांनी बांधलेल्या घरात, ज्या घरात आई-पप्पा राहिले त्याच घरात मी सध्या राहतोय. त्यांच्या असंख्य आठवणी वस्तूच्या स्वरूपात, प्रसंगाच्या रूपात या घरात आहेत. आम्ही तीनही भावंडे आपपल्या क्षेत्रात, संसारात स्थिरावल्याचे त्यांनी पाहिले. याचा आनंद व समाधान त्यांना होते .
माझ्या इन्स्टिटयूटचे व अलीकडील ' कवितेच्या गावा जावे' या माझ्या काव्य कार्यक्रमाचे उदघाटन त्यांच्या हस्तेच झाले . इन्स्टिटयूटच्या ५ व्या वर्धापनदिनी आई-पप्पा दोघेही हजर होते, तर नुकत्याच एप्रिलमध्ये पार पडलेल्या इन्स्टिटयूटच्या दशकपूर्तीच्या सभारंभास पप्पा अगदी पूर्णवेळ उपस्थित होते. माझे वर्तमानपत्र -मासिकांमधून आलेले लेख ते आवडीने वाचत. माझ्या गैरहजरीत माझी प्रगती माझ्या पत्नीकडून ते जाणून घेत. त्यांचे अव्यक्त प्रेम खूप काही सांगून जात असे. ;माझ्या कवितेच्या गावा जावे' या कार्यक्रमाचा सराव मी त्यांच्या समोर करत असे. त्यास ते हसून दाद देत .
पप्पा स्वभावाने शांत असले तरी मनाने व शरीराने खंबीर होते. यामुळेच निवृत्तीनंतरचा झालेला अपघात, दीर्घ काळ असलेला डायबिटीस, दहा वर्षापूर्वी बसवलेले पेसमेकर या शारीरिक व्याधीला त्यांनी वयाच्या ८१ वर्षापर्यंत खंबीरपणे तोंड दिले. कशालाही घाबरल्याचे, तब्येतीची किरकिर करत बसल्याचे कधी त्यांना आम्ही पाहिले नाही. या वर्षी त्यांचा 'सहस्त्र- दर्शन' सोहळा करण्याचा मानस आम्ही त्यांच्या जवळ व्यक्त केला . परंतु 'आईच्या माघारी माझा कोणताही कार्यक्रम नको ! फक्त शेवटी एकदा गोविंदाला/तिरुपतीला नेऊन आणा' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनुसार मागच्या मे मधे तिरुपतीची ट्रिप देखील आम्ही करून आलो . तिरुपती आमचे कुलदैवत असल्याने गोविंदावर त्यांची विशेष श्रद्धा होती. त्यांच्या सोबत अनेकदा आम्ही तिरुपतीला गेलो आहोत. त्याचा आनंद काही औरच होता.
तिरुपतीची ट्रिप करून आल्यानंतरही ३ आठवडे त्यांची तब्येत उत्तम होती. शेवटच्या १५ दिवसात शुगर वाढल्यामुळे व धाप लागल्याने त्यांना दोनदा ऍडमिट करावे लागले. त्यातुनही ते बरे झाले . फक्त अशक्तपणा काहीसा होता. शेवट पर्यंत ते जागरूक होते. अंथरुणावरही शांतपणे नामस्मरण ते करत असत. यातूनही ते परत चांगले बरे होतील अशी आशा आम्हा सर्वांना होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. १७ जून रोजी अवघ्या ५ मिनिटाच्या कालावधीत घरीच 'कार्डिक-अरेस्ट' ने तिन्ही सांजेला त्यांची प्राणज्योत मालवली. ज्या शांतपणे ते आपले अवघे जीवन जगले तेवढ्याच शांतपणे ते आम्हास सोडून गेले.
असे थोर वडील आम्हास मिळाले हे आमचे भाग्य. आज शरीर रूपाने ते आमच्यात नसले तरी त्यांचे आर्शिवाद नेहमीच आमच्या पाठीशी राहतील. त्यांनी साठवलेला पुण्यरूपी संचय भावी आयुष्यात नक्कीच आमच्या कामी येईल. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! व हि शब्दांजली त्यांच्या चरणी अर्पण !!.
महेश भा. रायखेलकर

खूप प्रेरणादायी आणि आदर्श लेख आहे हा!
ReplyDeleteआपल्या पप्पांची जीवनकथा ही माझ्या पैगंबरवासी अब्बूंशी अगदी मिळतीजुळती आहे.जुनी माणसे खरंच खूप सात्त्विक आणि नितीमत्तेला अगदी चिकटून असायची,नाहीत का?शेवटपर्यंत कष्ट करणे,हे त्यांच्या हाडामांसी भिनलेले असायचे.
धन्यवाद ! खरे आहे त्यांच्यातील एकही गुण आपण घेतला तर जीवन सार्थकी लागेल
ReplyDelete