कथा :     पेरले ते उगवले
                           

               शशांक देवधर हे खेम या तालुक्याच्या ठिकाणी ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते. सचोटी, प्रामाणिकपणा व योग्य किंमतीत दर्जेदार बांधकाम या कारणामूळे अल्पावधीत त्यांनी शहरात लोकप्रियता व नावलौकीक मिळवला. योग्य किंमतीत उत्कृष्ट घर बांधून मिळणे ही प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाची गरज असते, या कसोटीस शशांक देवधर पूर्णपणे उतरत. खेम हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी जिल्हयाच्या ठिकाणापासून अगदी ५० कि.मी. दूर असल्या कारणाने इथली बाजारपेठ चांगली होती. मध्यमवर्गीय व नोकरदार लोकांची संख्या या ठिकाणी जास्त होती. या लोकांना चांगली व योग्य किंमतीत अशी घरे बांधून देण्याचा ध्यास शशांक देवधर यांचा होता. यासाठी ते आपले या क्षेत्रातील ज्ञान, अनुभव व व्यावसायिक कुशलता यांचा मेळ घालत.
                 शशांक यांना सुहास नावाचा एक मुलगा कि जो नुकत्याच सुरु झालेल्या एका इंग्रजी शाळेत एल. के. जी. मध्ये तर मुलगी श्रावणी कन्या शाळेत ५ वी या वर्गात शिकते. शशांक व्यवसायात गर्क असल्याने या दोन्ही मुलांची शिक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी साहजिकच त्यांची पत्नी सुमानवर येवुन पडली. सुमनताई ती आनंदाने पार पाडत व त्यामुळेच शशांक यांना व्यवसायात झोकून देवून काम करणे शक्य होई. व्यवसायानिमित्त कधी कधी शशांक यांना आठ- आठ दिवस बाहेरगावी देखील राहावे लागत असे त्या काळात व इतर वेळी मुलांची, पाहुण्यांची जबाबदारी समर्थपणे सुमनताई पाहत.
              शशांक यांच्या साईटवर मनोहर नावाचा एक कामगार मागील ५ वर्षांपासून काम करत असे. मनोहर प्रामाणिक व कष्टाळू, पण काही व्यसनी मित्रांच्या संगतीने त्यास दारू पिण्याचे व्यसन लागले. सुरुवात मजा म्हणून केल्यानंतर व्यसनाने त्याचा चांगलाच ताबा घेतला. कधी कधी तो साईटवर देखील दारू पिऊन येवू लागला. एके दिवशी  शशांक साईटची पाहणी करत असतांना त्यांना मनोहर हा दारू पिऊन काम करतांना आढळला. शशांक देवधरांना व्यसनाचा भयंकर तिटकारा होता. त्यांनी त्यास तात्काळ कामावरून काढून टाकले. शशांक ही गोष्ट काही दिवसानंतर विसरूनही गेले. ऐके दिवशी ते ऑफीस मध्ये काम करत असतांना एक चाळीशीची बाई आपल्या १२-१३ वर्षाच्या मुलाला घेवुन आली. अधिक चौकशी केली असता ती मनोहर ची बायको कुसुम असल्याचे समजले. कामावरून काढून टाकल्याने मनोहर बेकार झाला. निराशेच्या गर्तेत तो अधीकच दारू प्यायला लागला. त्यातच त्याला कावीळ झाली व उपचारासाठी त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दारू मूळे त्याचे लिव्हरही खराब झाले होते. त्याचे शरीर उपचारास साथ देत नव्हते. काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याने प्राण सोडला. या घटनेने कुसुमवर आभाळच कोसळले. ती व तिंचा मुलगा मुकुंद अक्षरशः रस्त्यावर आली. ही सर्व व्यथा तिने देवधर साहेबासमोर कथन केली. ती आता देवधर साहेबांना काहीतरी काम देण्यास विनंती करत होती. हे सर्व ऐकल्यानंतर देवधर साहेबांना खूप वाईट वाटले. आपण मनोहरला तात्काळ कामावरून न काढता त्यास सुधारण्याची संधी द्यावयास पाहिजे होती असे
 त्यांना वाटले. खरंतर मनोहर त्याच्या व्यसनाने गेला पण ' सज्जन माणसास आपल्या नकळत केलेल्या चुकीची बोच असते', देवधर त्या पैकी एक होते. त्यांनी कुसुमला धीर दिला तसेच सोबत आलेल्या मनोहरच्या मुलाची आस्थेने चौकशी केली. चौकशीत मुकुंद ७ वी मध्ये शिकत असल्याचे कळले.  
            चेह-यावरून व त्याच्या बोलण्यावरून मुलगा   चुणचुणीत आहे हे शशांक देवधरांच्या चाणाक्ष नजरेतुन सुटले नाही. आपण जर मदत केली नाही तर या मुलाचे आयुष्य उध्वस्त होईल हे त्यांच्या लगेच लक्षात आले. सुमनताई मदतीसाठी, घरकामासाठी  त्यांना देखील घरी एक पूर्णवेळ बाई हवीच होती. त्यांनी तात्काळ सुमनताईंना फोन करून कुसुम बद्धल सांगितले व त्या दोघांची आपल्या बंगल्याकडे रवानगी केली.
           सुमनताईंनी कुसुमची प्राथमिक चौकशी केली व तीला कामाचे स्वरूप सांगितले. शशांक व सुमन यांनी कुसुम व तिचा मुलगा यांना घर नसल्याने, बंगल्याच्या आवारामधील एक खोली कि ज्यात काही बांधकाम साहित्य टाकले होते ती रिकामी करून रहावयास दिली. बंगल्यातील झाडलोट करणे, कपडे व भांडे धुणे, लहान सुहासला सांभाळणे ही सर्व कामे कुसुम ह्सत-मुखत  करीत असे. कधी कधी  मुकुंद देखील या कामी आईला मदत करी. प्रामाणीकपणा, स्वच्छ  काम यामुळे कुसुम ने देवधर पती-पत्नीचा अल्पावधीत विश्वास संपादन केला. लहान सुहासला देखील या दोघांचा चांगलाच लळा लागला. मुकुंद शिक्षणात हुशार आहे, हे कळल्यानंतर शशांक यांनी त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आपल्याकडे घेतली. मुकुंद शिकुन मोठा होवून आपले हे वाईट दिवस संपवेल याची कुसुमला खात्री होती. या कामी देवधर कुटुंबाचा तिला खूप आधार होता.
                  सुमनताई सणावारास आपल्या मुलांसोबत मुकुंदाला देखील कपडे, गोडधोड देत. सुमनताईची मुलगी श्रावणी राखीपौर्णिमेस, सुहास सोबत मुकुंदला देखील राखी बांधत असे. अशाप्रकारे मुकुंद व कुसुम देवधर कुटुंबाचे एक प्रकारे सदस्यच झाले.
                काळ हळू हळू पुढे सरकत होता. मुकुंद मन लावून अभ्यास करत असे. त्यास आपल्या परिस्थीतीची पूर्ण जाणीव होती. मोठे होवून आईला सुखात ठेवायचे स्वप्न तो पाही. देवधर साहेबांच्या उपकाराची त्यास जाणीव होती.अभ्यास करून फावल्या वेळेत तो देवधर साहेबांच्या घरची व ऑफिसची कामे करण्यास काहीही कमीपणा मानत नसे. उच्चं शिक्षणानेच आपली परिस्थीती बदलू शकते याची त्याला लहान वयातच  जाणीव होती. म्हणतात ना '  परिस्थीती माणसास सर्वकाही शिकविते' देवधर साहेबांच्या देखील त्याच्याकडून खूप अपॆक्षा होत्या व मुकुंद देखील त्या पूर्ण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत होता.
             देवधर जरी बांधकाम व्यावसायिक असले तरी त्यांना आपला मुलगा सुहास याने डॉक्टर बनावे असे वाटे, त्याला कारण देखील तसेच होते. त्यांचा मेडीकलचा प्रवेश अवघ्या काही मार्काने हुकला होता. आपले अधुरे स्वप्न आपल्या मुलाने पूर्ण करावे असे त्यांना वाटत असे. मात्र त्याच्या हॉस्पिटलचे बांधकाम ते स्वतः च्याच देखरेखीखाली करणार होते. त्यासाठी त्यांनी जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जागा देखील खरेदी केली. भविष्यात त्यांना देखील तेथेच स्थायिक व्हायचे होते. 
                आज कुसुमसाठी अगदी आनंदाचा दिवस . तिचा मुकुंद एम.बी.ए. ची परिक्षा विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाला. तिने सर्वप्रथम हि बातमी व पेढे मुकुंदास देवधरसाहेब व सुमनताई यांना द्यावयास सांगीतले. मुकुंदने दोघांचे पाया पडुन हि बातमी सांगीतली. दोघांनाही अत्यानंद झाला, त्यांनी मुकुंदावर दाखवलेला विश्वास व त्यावर उच्चशिणासाठी केलेला खर्च त्याने सार्थ करून दाखविला. म्हणतात ना, ' भगवान जब देता है तो छप्पर फाडके देता है' असेच काही कुसुमच्या बाबतीत देखील झाले. मुलगा एम. बी. ए. ची परीक्षा पास झाल्याचा आनंद असतांना तिला अजुन एक आनंदाची बातमी समजली. कॉलेच च्या प्लेसमेंट मध्ये आय.सी.सी.आय. बँके तर्फे घेतलेल्या मुलाखतीत मुकुंदची निवड झाली व त्यास पुढील ५ महिन्याच्या ट्रेनिंग  साठी बेंगलोरला जावयाचे होते. गाव व  आईला सोडून जावयाचे म्हणुन मुकुंद हिरमुसला पण देवधर दाम्पत्याने त्याची समजुत घातली व या संधीचे सोने करण्यास सांगीतले. मुकुंद काहीसा नाराजीतच बेंगलोरला जावयास रवाना झाला. ६ महीन्यांचे ट्रेनिंग  पूर्ण केल्यानंतर त्यास बेंगलोर येथीलच एका ब्रँच मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून बँकेतर्फे नेमणूक करण्यात आली. मुकुंदचे स्वप्न पूर्ण झाले. आता त्यास आपल्या आईला बेंगलोर मध्ये आणून स्वतः जवळ सुखात ठेवायचे होते. त्यासाठी त्याने एक फ्लॅट भाडयाने घेतला.
                 आईला घेवून जाण्यासाठी तो खेमला आला. त्याने देवधरसाहेब व सुमनताईंची त्यासाठी परवानगी मागितली. इतक्या वर्षाच्या जिव्हाळामुळे त्यांना वाईट वाटले, पण कुसुमला चांगले दिवस पाहता येतील व आपल्या मुलासोबत राहता येईल यासाठी त्यांनी त्यास आनंदाने परवानगी दिली. कुसुम व मुकुंद आनंदाने बेंगलोरला राहत. अधूनमधून तो देवधर साहेबांना फोन वरून ख्यालीखुशाली विचारत असे. मुकुंदची कामाची प्रगती पाहून बँकेने त्यास ब्रँच मॅनेजरचे प्रमोशन दिले. मुकुंद मन लावून काम करे व कुसुम त्याची प्रगती पाहुन सुखावुन जात असे. मुकुंद हा तडफदार व हुशार असल्याकारणाने काही कालावधी नंतर बँकेने त्यास मोठी जबाबदारी देण्याचे ठरवले, पण त्या आधी त्यास १ वर्षाच्या ट्रेनिंग साठी अमेरिकेस जावे लागणार होते. बँकेने आईला देखील सोबत घेवून जाण्याची परवानगी दिल्या नंतरच तो अमिरिकेस जाण्यास तयार झाला. प्रथम हि बातमी त्याने देवाधरसाहेबांना फोन वरून सांगीतली. त्यांनी त्यास शुभेच्छा दिल्या. सुमनताईंना हि बातमी ऐकून अतीशय आनंद झाला.
         इकडे देवधरसाहेब एका महत्वकांक्षी प्रोजेक्टवर काम करत होते.  त्यांना मध्यमवर्गीय यांना परवडेल अश्या १०० घरांची टाऊनशीप बांधायची होती. त्यासाठी    त्यांनी खेम जवळ जागा देखील घेतली. हा त्यांच्या कार्यकाळातला सर्वात मोठा 'प्रोजेक्ट'. हा   'प्रोजेक्ट' पूर्ण झाल्यानंतर १०० मध्यमवर्गीय कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार होते. यासाठी त्यांनी आतापर्यंत जमा केलेली सर्व पुंजी व बँकेचे मोठया प्रमाणात कर्ज घेतले. हा  'प्रोजेक्ट'   यशस्वी होणारच यांची त्यांना व सुमनताईंना खात्री होती. शशांक रात्रंदिवस या प्रोजेक्टवर काम करत. सुहास देखील या वर्षीच १२ वी सायन्स ला तसेच श्रावणी एम.कॉम. च्या शेवटच्या वर्षात होती. तिला पुढे प्राध्यापक होवून अर्थशास्त्रात डॉक्टरेट देखील करायची होती . १० वी नंतरच डॉक्टर होवून आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करावयाचे असे सुहास ने ठरवले. शशांक,सुहास व श्रावणी यांच्या दृष्टीने हे वर्ष महत्वाचे होते. कारण ते जीवनातील आपापले स्वप्न पूर्ण करण्याच्या टप्प्यावर आले होते. सुमनताई गृहस्वामिनीच्या नात्याने या सर्वांना मदत करत.
           सर्व आपापल्या कार्यात व्यस्त, पण नियतीला काहीतरी वेगळेच घडवायचे होते. देवधरसाहेबांना एकेदिवशी प्रोजेक्टच्या कामासाठी मुंबईला जावयास निघाले. लवकर जाता येईल व मुंबईमध्ये कामानिमित्त फिरणे सोपे जाईल, या दृष्टीने ते कारने जावयास निघाले. त्यांच्या सोबत त्यांच्या  प्रोजेक्टवर काम करणारा रमेश नावाचा इंजिनियर होता. कार पुण्यापासुन थोडी पुढे गेल्यानंतर भरधाव येणा-या एका ट्रकने   कारला धडक दिली. धडक इतकी जोरात होती कि देवधर कार चालवत असल्याने जागीच मरण पावले. सोबतचा रमेश बाहेर फेकला गेल्याने त्यास थोडी जखम झाली व तो वाचला.
      रमेश बाहेर फेकल्या गेल्या कारणाने त्यास फारसे लागले नव्हते. त्याने प्रसंगावधानाने लगेच सावरून सुमनताईंना फोन केला. फोनवर ही बातमी ऐकून सुमनताई जागीच कोसळल्या. जवळ असलेल्या सुहास व श्रावणीला काय झाले हे समजले नाही. "आई आई काय झाले ?" म्हणुन ते दोघे विचारु लागली.  सुमनताईंनी रडतच ही दुःखद बातमी त्या दोघांना सांगितली. आपले बाबा गेले हे ऐकून त्यांना मोठा धक्का बसला व ते धाय मोकलून रडू लागली. एव्हाना ही बातमी वा-यासारखी सर्व गावात पसरली . शेजारचे गोपाळ काका व त्यांची पत्नी धावतच देवधरांच्या घरी आली. त्यांनी सुमनताई, सुहास व श्रावणी यांना धीर दिला. पंचनामा केल्यानंतर देव्हारसाहेबांचा देह ताब्यात देण्यात आला. गावातील हजारो लोकांच्या उपस्थितीत सुहासने आपल्या पित्यास भडाग्नी दिला. देवधर कुटुंबाची नियतीने क्रूर अशी चेष्टा केली होती. सर्व होत्याचे नव्हते झाले. श्रावणीने ही बातमी मुकुंदला कळवायची का असे आईस विचारले. पण त्याही परिस्थितीत सुमनताईनी आपले दुःख गिळून 'नको' असे सांगितले. कारण मुकुंदचे  नुकतेच अमेरिकेला ट्रेनिंग चालु झाले होते.  ट्रेनिंगच्या काळात त्यास सुट्टी मिळणे शक्य नव्हते. ही जर बातमी त्यास कळवली तर तात्काळ तो अमेरिकेतून खेम मध्ये येईल याची त्यांना खात्री होती. पण त्यामुळे त्याचे  ट्रेनिंग अर्धवट राहणार,  ट्रेनिंग नंतर मिळणाऱ्या मोठ्या जबाबदारीस त्यास मुकावे लागले असते. या सर्वामुळे मुकुंदच्या करीअरवर मोठा परिणाम होणार होता. ते सुमनताईंना नको होते. त्यांचा जीवनसाथी तर गेला , ते नुकसान कधीच भरून निघणार नव्हते व परत आपल्या मुलासारख्या वाढवलेल्या मुकुंदचे नुकसान व्हावे हे त्यांना कदापी मान्य नव्हते. ' केवढा हा मनाचा मोठेपणा' .
          सुमनताईंनी प्राप्त परिस्थितीत स्वतःला सावरले. त्यांच्या समोर सुहास व श्रावणीचे भविष्य होते. सुहास व  श्रावणीची दोघांचीही परिक्षा जवळ आली. बाबा जाण्याचे दुःख होतेच पण त्याही परिस्थितीत त्यांनी सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले. त्या काळात परीक्षेतील उज्वल यश हीच देवाधरसाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार होती. शशांक व सुमनताईनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले होते. देवधर यांच्या जाण्याने त्यांचा बांधकाम व्यवसाय ठप्प झाला. त्यांचा टाऊनशीपचा प्रोजेक्टही त्यांच्या जाण्याने रखडला. त्या 'प्रोजेक्ट' मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली गेली असल्याकारणाने आर्थिक प्रश्न गंभीर झाला. बँकेचे कर्जाचे हप्ते तटले. हाताखालील एक एक जण सोडून जावू लागला. सुमनताईंची आर्थिक अडचण पाहून त्यांच्या नातेवाईकांनी देखील काढता पाय घेतला , की ज्यांना देवधर साहेबांनी त्यांच्या  अडचणींत आर्थिक मदत केली होती.  म्हणतात ना ' घर फिरले की घराचे वासेही फिरतात'. बांधकामासाठीचे साहित्य ज्यांच्या कडून उधार स्वरूपात घेतले होते, त्यांनी पैशाच्या मागणीसाठी तगादा लावला. सुमनताई सर्व बाजुनी संकटात सापडल्या व त्यामुळे त्या हवालदिल झाल्या.
              इकडे मुकुंद अमेरिकेहून ट्रेनींग पूर्ण करून परत भारतात आला. त्याची बँकेने बँकेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या रिजिनल मॅनेजर पदी नेमणूक केली, की ज्याचे काम त्यास मुंबई मधून पाहावे लागणार होते. त्याच्या पगारात बँकेने भरघोस वाढ केली. बँकेतर्फे त्यास बंगला व कार देखील मिळाली. पोराचे हे वैभव पाहुन कुसुमला आकाश ठेंगणे झाले. मुकुंदचे या वर्षी लग्न करून आपली जबाबदारी पूर्ण करावयाची असे तिने ठरविले. मुकुंदला या बाबतीत छेडले असता तो हसून विषय टाळत असे.
           मुकुंद आज भलत्याच खुशीत होता. बँकेने खेम मध्ये शाखेचे नवीन शाखेचे उदघाट्न करण्यासाठी त्यास उदघाटक म्हणून खास निमंत्रित केले  होते. ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो त्या गावास आज या निमित्त त्यास जावयास मिळणार होते. तसेच कित्येक वर्षांनी त्याची देवधर साहेब व सुमनताईंची भेट होणार होती. आपल्या सोबत खेळलेले सुहास व श्रावणी आता मोठे झाले असतील या कल्पनेने तो सुखावला. या सर्वांना भेटण्यास तो आतुर झाला. त्याने या सर्वाना देण्यासाठी भेट वस्तूंची खरेदी केली. आज जे वैभव त्यास प्राप्त झाले ते सर्व देवधर कुटुंबियांच्या मदतीमुळे. त्याने आपल्या सोबत आईला देखील घेतले. आधी काही न कळवता आपण अचानक  जावून देवधर साहेबांना सुखद धक्का देवु असे त्याने ठरवले. 
             कित्येक दिवसानंतर सुमनताईंच्या चेह-यावर हास्य होते. त्यांचा मुलगा सुहास व श्रावणी चांगल्या मार्काने पास झाले. मुलांचे हे यश पहायला त्यांचे बाबा नाहीत हे आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. सुहासला पुढे मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता. सी.ई.टी.ला. काही मार्क कमी पडल्याने त्यास सरकारी कॉलेज मध्ये प्रवेश मिळणे शक्य झाले नाही. मुंबईच्या एका नामांकीत खाजगी कॉलेजसाठी त्याचा नंबर लागला पण त्यासाठी  दोन लाख डोनेशन देणे क्रमप्राप्त होते व पुढील शिक्षणाचा खर्च देखील जास्त होता. एवढी रक्कम सुमनताईंना उभारणे शक्य नव्हते. व्यववसायाच्या उधारीची रक्कम त्यांनी अंगावरील सोने विकून व स्वतःजवळील काही रक्कम देवून पूर्ण केली होती. घरावर देखील देवधर साहेबानी ' प्रोजेक्ट' साठी कर्ज काढले होते हे  त्यांना नंतर कळाले. ' प्रोजेक्ट' पूर्ण झाल्याशिवाय आर्थिक घडी नीट बसणार नव्हती. पण प्रोजक्टवर लक्ष द्यायला कोणी नसल्याने तो रखडला होता. सुमानताईंना बाहेरील व्यवहाराची काही कल्पना नसल्याने व सुहास  वयाने लहान  असल्याने त्या हतबल होत्या. 
          मुकुंद व कुसुम ठरल्या दिवशी खेम मध्ये ब्रँचच्या उदघाट्सानाठी आले. बँकेने त्या दोघांची शहरातील एक नामांकित हॉटेल मध्ये उतरण्याची सोय केली. उदघाटनाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता असल्या कारणाने कार्यक्रम उरकुन नंतर देवधरसाहेबांकडे जाण्याचे मुकुंदने ठरवले. त्याला कधी एकदा देवाधरसाहेब व सुमनताई या त्याच्यासाठी देवमाणस असल्यांना भेटू असे झाले त्यामुळे त्याने आपले भाषण देखील आवरते घेतले. 
          मुकुंद व कुसुम कारने देवाधरसाहेबांच्या बंगल्यापाशी आली. मुकुंदने कार पार्क केल्यानंतर कुसुम व मुकुंद गेट उघडून आत आली . मुकुंदने दारावरील बेल वाजवली. दार कोणी उघडत नसल्याचे पाहुन त्याने एकदा दोनदा दाराची कडी देखील वाजवली. थोडावेळ वाट पाहिल्यानंतर दार उघडले गेले. त्याच्या समोर निस्तेज चेह-याच्या सुमनताई उभ्या होत्या.  त्यांचा चेहरा पाहून मुकुंदच्या काळजात चर्र झाले. सुमानताईंनी त्यास प्रथम ओळखले नाही, नंतर कुसुमला व त्यास नीट न्याहळयानंतर त्यांना ओळख पटली. त्यांनी उभयतास घरात घेतले. भिंतीवरील हार घातलेला देवधरसाहेबांचा फोटो पाहून मुकुंदला लक्षात सर्व आले. आज त्याचा देव देव्हा-यात नव्हता. एव्हाना सुमनताईंनी सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून कुसुम व मुकुंद दोघेही गलबलुन गेली. सुहास देखील मुकुंदच्या समोर आला, त्यास मिठी मारून मुकुंद ओकसाबोक्सी रडू लागला. त्याचे पित्याचे छत्र लहानपणीच हरवले व पित्यासमान देवाधरसाहेब देखील आज या जगात नव्हते. सुमनताई व कुसुम ने त्यास सावरले. सुमनताई हतबल तरी स्वाभिमानी होत्या  त्यांनी आपली आर्थिक बिकट अवस्था मुकुंदसमोर कथन केली नाही. 
              देवधरांच्या शेजारी राहणा-या गोपाळकाकांनी मुकुंदला सुमनताईंच्या गंभीर आर्थिक परिस्थितीची कल्पना दिली. मुकुंदने त्याच  वेळेस या वाईट परिस्थितीतुन सुमनताईंना व त्यांच्या मुलांना बाहेर काढावयाचे असा निर्धार केला. सुमनताई प्रथम मुकुंदची मदत घ्यावयास संकोचत होत्या. पण कुसुम व त्याने हरप्रकारे त्यांना समजावले. आज जे वैभव मुकुंदास प्राप्त झाले ते देवधरसाहेब व सुमनताईंच्या वेळेवर दिलेल्या आधारामुळेच. देवधर साहेबांनी व सुमनताईंनी त्यास मुलाप्रमाणे वाढवले. ह्या सर्व बाबी कुसुम, मुकुंदने सुमनताईंना समजावून सांगितल्या नंतर त्या राजी झाल्या. 
             प्रथम मुकुंदने सुहासचे ऍडमिशन दोन लाख डोनेशन भरून मुंबईच्या त्याच्या नंबर लागलेल्या नामांकित कॉलेजात केले व पुढील शिक्षणाची देखील तजवीज केली. श्रावणीस कि जिला तो बहीण मानत असे तीचे देखील उर्वरीत शिक्षण पूर्ण केले  कि ज्यामुळे तीचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. देवधरसाहेबाकडे असलेल्या रमेश या तरुण इंजिनियरच्या मदतीने त्याने देवधर साहेबांचा महत्वकांक्षी ' प्रोजेक्ट' पूर्ण केला कि ज्यामुळे देवधर कुटुंबाची आर्थिक गाडी रुळावर आली.  'प्रोजेक्ट' पूर्ण झाल्यानंतर आलेल्या पैश्यातुन त्याने देवधरसाहेबांनी काढलेले सर्व कर्ज फेडले व उरलेले पैसे सुहासच्या पुढील हॉस्पिटलच्या उभारणीसाठी साठवून ठेवले. कुसुम सारखे मुकुंदच्या मागे लंग्न कर म्हणून लागे, पण जोपर्यंत सुहास डॉक्टर होत नाही व श्रावणीचे लंग्न होत नाही तो पर्यंत लग्न न करण्याचा निर्णय त्याने कुसुमला सांगितला. हे ऐकून कुसुमचे काळीज मुलाबद्धलच्या अभिमानाने भरून आले. उर्वरित शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रावणी खेम जवळील जिल्हाच्या ठिकाणी एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाली. तीचे स्वप्न पूर्ण झाले. प्रोजेक्टमुळे रमेश व मुकुंदची चांगली मैत्री झाली. रमेश अविवाहित, मुकुंदने श्रावणीसाठी त्याच्याकडे शब्द टाकला. त्याला श्रावणी पसंद होती. श्रावणीने देखील मुकुंद सोबत रमेशला पहिले होते, तिला देखील तो आवडत असे. एका चांगल्या मुहूर्तावर मुकुंदने तिचे लग्न रमेश सोबत अगदी थाटामाटात लावुन दिले. एव्हाना देवधरसाहेबांच्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी त्याने रमेशकडे सुपूर्त केली. सुहासने देखील आपले डॉक्टरकीचे उच्च शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या एका नामांकित हॉस्पिटल मध्ये काम करण्यास सुरवात केली. काही काळ अनुभव घेतल्यानंतर स्वतःचे हॉस्पिटल चालू करण्याचा त्याचा मानस होता. 
               आज सुमनताईं  अतीशय आनंदीत होत्या . त्यांच्या हस्ते सुहासचा 'देवधर हॉस्पिटल' चे उदघाट्न झाले व याच दिनाचे निमित्त साधून  मुकुंदच्या साखरपुड्याचा सोहळाही पार पडला. या प्रित्यर्थ सर्व कुटुंब उपस्थित होते. देवधरसाहेबांच्या माघारी त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण झाली. साहजिकच त्यांची उणीव सुमनताईना जाणवत होती. 
                  आजही मागे वळून पाहतांना सुमनताईंना देवधरसाहेब गेल्याचा काळ आठवतो. मुकुंदने दिलेल्या खंबीर साथीमुळे त्यांचे कुटुंब आर्थिक व मानसीक संकटातून सावरले. रक्ताच्या नात्याने पाठ फिरवली होती. पण कुसुम व मुकुंद या जोडलेल्या नात्यांनी त्यांना सावरले. जे रोपटे जीवनातील  संकटाच्या वणव्यात जळून गेले असते, त्यास योग्य वेळी आपल्या मायेच्या पंखाखाली देवधर साहेबांनी घेतले. त्याच रोपट्याचे पुढे मुकुंदरूपी वटवृक्ष होवून केलेल्या उपकारांची जाणीव ठेवत, देवधर साहेबांच्या कुटुंबास त्यांच्या माघारी सावली दिली. ' पेरले ते उगवले होते !! ,  पेरले ते उगवले होते !!! ' 

© महेश भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog