"कृतज्ञता व्यक्त करा " मान्य जीवनाची वाटचाल करत असतांना मोठी स्वप्न पहावीत , महत्वकांक्षा ठेवावी . त्या स्वप्नांचा, महत्वकांक्षेचा कशोशीने पाठलाग करावा . त्यासाठी पाहिजे तेवढे कष्ट, धडपड करण्याची तयारीही ठेवावी. पण हे करत असतांना जे सध्या आपल्याजवळ आहे त्याचे काय? त्याबद्दलची कृतज्ञता कधी आपल्या मनात उमटते का ? नसेल तर आपल्या सारखे करंटे आपणच . आपल्या शास्त्रात म्हटले जाते ८४ लाख योनिचा प्रवासा नंतर माणसाचा जन्म होतो . अशा आपल्याला मिळालेल्या अमूल्य मानवी जीवना बद्दल आपण कृतज्ञ आहोत का ? दुर्देवाने जगात कितीतरी जणांना जन्मतः अपंगत्व असेल आपल्याला ते नाही या बद्दल आपण कृतज्ञ आहोत का ? गरीब किंवा श्रीमंत घरात जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही . परंतु लहानपणीच गरिबीचे चटके न बसता आपण त्या मानाने खात्यापित्या, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत घरात जन्माला आलो त्यासाठी आपण कधी आभार व्यक्त केले आहेत का ? कोणा माता-पित्याच्या पोटी आपण जन्म घ्यावा हेही आपल्या हातात नाही. ...