एक जन्म दोन जीवन एका अंगणातले रोपटे दुस-या अंगणी लावावे कोणी फुलूनिया यावे तर कोणी कोमेजून जावे हे फक्त स्त्रियांच्या नशिबीच असावे एका जन्मात दोन जीवन जगावे ! सोडावा हळुच आईचा मायेचा पदर विसरावा बापाचा प्रेमाचा पाझर भावंडाची हितगुज मागे पडणार सख्यांची आठवण मनी राहणार ! सगळ्यांशी मिळून - मिसळुन वागावे दु:ख आपले आतल्या आत गिळावे मानावे सर्वच गोडं गोडं जरी असले त्यात कडु थोडं ! झिजावे सर्वांच्याच सुखासाठी मारावी येणा-या संकटावर काठी स्वत:चा विचार सोडुनी द्यावा या समईचा प्रकाश सर्वांनी घ्यावा ! संसार हा एक यज्ञासमान जाळावे स्वत:ला त्यात समिधा बनून उजळून टाकावा सारा अंधार करावे स्वर्गासमान आपले घर ! स्त्रियांनो तुमचे मन फार थोर सुखाने नांदावे त्यात दोन्ही घर तुम्ही करता दोन कुळांचा उद्धार यासाठी तुम्हांस सलाम त्रिवार !! © महेश भा. रायखेलकर